Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, ९ फेब्रुवारी, २०२५

शिरपूर तालुक्यात दोन कोटी रुपयांचा गांजा जप्त..!



शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर तालुका पोलिसांनी आंबे गावाच्या शिवारात रुपसिंगपाडा येथे वनजमिनीवर गांजाची अवैध लागवड उघडकीस आणली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून ११ हजार किलो गांजा जप्त केला, ज्याची किंमत २ कोटी २० लाख रुपये आहे. या प्रकरणी कैलास भावसिंग पावरा या
आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पावरा याने मानवी मेंदूवर विपरीत परिणाम घडवणाऱ्या गांजा या अंमली पदार्थाची व्यापारी प्रमाणात उत्पादन करण्यासाठी अवैधरित्या लागवड केली होती. पोलिस अधीक्षक, धुळे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या दोन पथकांनी संयुक्त कारवाई केली. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे आणि सपोनि श्रीकृष्ण पारधी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

छापा टाकून पाहणी केली असता, कैलास पावरा हा गांजाची अवैधरित्या लागवड करताना आढळला. पोलिसांनी घटनास्थळावरून २ कोटी २० लाख रुपये किंमतीचा ११ हजार किलो वजनाचा गांजा वनस्पती जप्त केला. याबाबत पोहेकॉ/२५७ पवन गवळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोसई मनोज कचरे करीत आहेत. 

या यशस्वी कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम पवार, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, सपोनि श्रीकृष्ण पारधी, पोसई सुनील वसावे, पोसई प्रकाशपाटील, पोसई मनोज कचरे, पोसई मिलींद पवार, असई कैलास जाधव, पोहेकॉ पवन गवळी, पोहेकॉ अनिल चौधरी, पोहेकॉ आरीफ पठाण, पोकॉ मनोज नेरकर, पोहेकॉ चेतन बोरसे, पोकॉ कमलेश सूर्यवंशी, पोकॉ हर्षल चौधरी, पोकॉ राहुल गिरी आणि चापोकॉ सतिष पवार, चापोकॉ सागर कासार यांचा सहभाग होता.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध