Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २९ डिसेंबर, २०२४

कुत्रा चावून रेबीज झाल्याने एकाचा मृत्यू



महिनाभरात १०३ जणांना चावा , निर्बीजिकरण रखडले
अमळनेर : कुत्रा चावून रेबीज झाल्याने एका ५३ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना २७ रोजी शिरूड नाका परिसरात घडली. गेल्या महिनाभरात अमळनेर तालुक्यात सुमारे १०३ जणांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे.

    शिरूड नाका परिसरातील प्रवीण मदन सूर्यवंशी वय ५३ याला ऑगस्ट २०२१ मध्ये कुत्र्याने चावा घेतला होता. मात्र त्यावेळी त्याने अँटीरेबीज ची लस अथवा उपचारासाठी कोणतेही औषध घेतले नव्हते. प्रवीण याला दारूचे व्यसन असल्याने अनेकदा तो कुत्र्याच्या लहान पिल्लुशी खेळत असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. दोन महिन्यांपूर्वी देखील प्रवीण याला कुत्रा चावला होता व तेव्हाही त्याने इंजेक्शन घेतले नव्हते. 

     २६ रोजी प्रवीण ला अचानक पाण्याचा फोबिया झाला. त्याला कोणीतरी आपल्या अंगावर पाणी टाकतेय म्हणून भीती वाटू लागली. म्हणून त्याला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. सुरुवातीला डॉक्टरांना दारूच्या नशेत असल्याने दारू मुळे हा प्रकार होत असावा असे वाटले. नंतर डॉक्टरांना लक्षात आले. इंजेक्शन दिल्यावर प्रवीण बोलका झाला तेव्हा त्याने चौकशीत दोन वेळा कुत्रा चावल्याचे सांगितले. २७ रोजी त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी खबरदारी म्हणून प्रवीण च्या संपर्कात आलेल्याना देखील अँटीरेबीज इंजेक्शन दिले आहेत. प्रवीण चा मृत्यू झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

       गेल्या महिनाभरात अमळनेर तालुक्यातील नगाव ,गडखाम्ब , मंगरूळ ,ढेकू ,शिरूड नाका अशा विविध भागांतील  सुमारे १०३ लोकांना कुत्रा चावला आहे. लहान मुलांचे प्रमाण अधिक आहे.

      कुत्रा चावणे नागरिकांनी सहज  घेऊ नये. ग्रामीण रुग्णालयात अँटीरेबीज इंजेक्शन मोफत देण्यात येते. कुत्रा चावल्याबरोबर लगेच इंजेक्शन घ्यावे आणि दिलेल्या  तारखेवरच तीन कोर्स पूर्ण करावेत अन्यथा रेबीज होऊन अखेर मृत्यू होऊ शकतो.-डॉ जी. एम. पाटील , मुख्य वैद्यकीय अधिकारी ,ग्रामीण रुग्णालय अमळनेर*

       शिरूडनाका परिसरात कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे. या  भागातील एकाच कुत्रीने किमान ५० जणांना चावा घेतला आहे. याचा बंदोबस्त झाला पाहिजे. -योगेश पाटील , मयताचा नातेवाईक*

      शहरातील कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचा ठेका देण्यात आला आहे. घनकचरा प्रकल्पाकडे शेड बांधण्यात आले आहे. त्याचे काम पूर्ण झाल्यावर निर्बीजिकरण करण्यात येईल.-संतोष बिऱ्हाडे , आरोग्य निरीक्षक ,अमळनेर नगरपरिषद.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध