Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३१ डिसेंबर, २०२४

दुचाकीचा हॉर्न वाजविल्याने दोन गटात हाणामारी.



शिरपूर प्रतिनिधी :-शहरातील किस्मत नगरात शनिवारी रात्री दुचाकीचा हॉर्न वाजविण्यावरून दोन गटात तुंबळ हाणामारीची घटना घडली. यात एकाने चाकु हल्ला केल्याने इसम गंभीररित्या जखमी झाला तर दुसऱ्या गटातील तरूणासह त्याची आई जखमी झाली. 

याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात परस्पर फिर्याद दाखल करण्यात आली आहे.दरम्यान, घटनेची नोंद होताच शिरपूर शहर पोलिसांनी एकूण सहा जणांना ताब्यात घेतले आहे. दीपक रतिलाल खैरनार (२६), रा.किस्मत नगर, हुडको शिरपूर या इसमाने दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २८ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास ते त्यांच्या लहान मुलीसह उभे असतांना नदिम युनूस पठाण हा त्याचे ताब्यातील दुचाकीने जोरजोरात हॉर्न वाजवित जात होता. त्यास गल्लीतून जातांना जोरात हॉर्न वाजवू नको असे सांगितले. याचा राग आलेल्या नदिमने त्याच्या हातातील चाकूने डोक्यावर वार केला. 

यात डोक्यावर गंभीर स्वरूपाची जखम झाली. एवढ्यावर न थांबता युनूस पठाण,मुमताज युनूस पठाण, कलीम सलीम पठाण व फरीद पठाण सर्व रा.किस्मत नगर यांनी उपचारार्थ दवाखान्यात जात असतांना बेदम मारहाण केली. 

यात मुमताज पठाण हिने काठीने तर इतर चौघांनी शिवीगाळ व दमदाटी करीत हाताबुक्क्यांनी मारहाण केली. या फिर्यादीवरून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात वरील पाच संशयितांविरूध्द दंगलीसह अन्य कलमांतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास पोहेकॉ सी.एस. सोनवणे करीत आहेत. दरम्यान, घटनेची नोंद होताच नदिम युनूस पठाण, युनूस मुनीद पठाण व फरीद पठाण यांना शिरपूर शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर नदीम पठाण (२२), रा.किस्मत नगर, हुडको शिरपूर याच्या फिर्यादीची दखल घेत शिरपूर शहर पोलिसांनी दीपक (नाव माहीत नाही), घनश्याम (पूर्ण नाव माहीत नाही), चेतन साहेबराव धनगर,गोलु (पूर्ण नाव माहीत नाही) सर्व रा. किस्मत नगर, हुडको, शिरपूर यांचे विरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, घटनेची नोंद होताच शिरपूर शहर पोलिसांनी दीपक,घनश्याम व चेतन धनगर यांना ताब्यात घेतले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध