Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २९ डिसेंबर, २०२४

रूग्णांना शिवीगाळ करणाऱ्या महिला डॉक्टरवर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी




१०८ रुग्णवाहिका असती तर बाळ मेले नसते, मांडळ आरोग्य सेवा कोलमडली*

अमळनेर : तालुक्यातील मांडळ येथील रुग्णांना शिवीगाळ करणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दोन महिला वैद्यकीय अधिकारींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान चौकशीत महिला डॉक्टरांनी देखील त्यांना शिवीगाळ झाल्याचा आरोप केला मात्र डॉक्टरांनी शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

मांडळ येथील ज्ञानेश्वर शालीक पारधी याच्या पत्नी हिराबाई सहा महिन्यांची गर्भवती असताना दोन तीन दिवसांपूर्वी प्रसूतीपूर्व कळा सुरू झाल्या होत्या. घरी कोणी नसल्याने महिला विव्हळत होती. गावातील आशा स्वयंसेविका ती परिस्थिती बघून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला डॉक्टरांना बोलवायला गेल्या. मात्र डॉक्टरांनी महिलेच्या घरी येण्यास नकार दिला. आरोग्य केंद्रांसाठी असलेली १०२ रुग्णवाहिका बाहेर गेलेली होती. म्हणून अखेरीस महिलेच्या पतीने तिला खाजगी वाहनाने ग्रामीण रुग्णालयात नेले आणि नन्तर धुळ्याला हलवण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी महिला प्रसूत झाली आणि तिचे बाळ मेले.

यासंदर्भात महिलेचे नातेवाईक प्राथमिक आरोग्य केंद्रात जाब विचारायला गेले असता तेथील महिला डॉक्टर प्रतीक्षा पाटीलने घाणेरड्या शब्दात शिवीगाळ केली. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
मांडळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ प्रतीक्षा पाटील आणि डॉ साक्षी बोरसे यांच्यावर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन ज्ञानेश्वर पारधी , संदीप शिरसाठ , शांताराम कोळी , शंकर धनराज , कैलास पारधी ,सोमनाथ कोळी , अक्षय कोळी ,प्रवीण रोडे ,भावेश रोडे , ज्ञानेश्वर कोळी , दीपक कोळी , अशोक बडगुजर ,नरेंद्र परदेशी यांनी जिल्हा आरोग्य अधिकारींना दिले आहे.

याबाबत चौकशी केली असता महिलेच्या नातेवाईकांनी असे सांगितले की डॉक्टरने शिवीगाळ केली त्याचा व्हिडीओ सुद्धा सादर केला. तर महिला डॉक्टर प्रतिक्षा पाटील यांनी असे सांगितले की महिलेच्या नातेवाईकांनी आधी शिवीगाळ केली. त्याबाबत काहीच पुरावा मिळालेला नाही. दोन्ही बाजूने म्हणणे ऐकल्यांनंतर हा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ गिरीश गोसावी यांनी सांगितले.

दरम्यान तालुक्यातील मांडळ प्राथमिक आरोग्य केंद्राला १०८ रुग्णवाहिका नसल्याने अनेक रुग्णांना हाल भोगावे लागले आहेत. अनेकदा आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थ यांच्यात वाद झाले आहेत. आरोग्य केंद्र असून अनेकदा खाजगी वाहने २५ ते ३० किमी प्रवास करून उपचारासाठी जावे लागते. त्यामुळे मांडळ आरोग्य केंद्रात १०८ रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यास डॉक्टर व रुग्ण किंवा कर्मचारी व रुग्ण यांच्यात होणार नाहीत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध