Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, ९ नोव्हेंबर, २०२४

मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही: तानाजी सावंत आमदारच नव्हे, तर नामदार होतील !

परांडा (राहुल शिंदे) दि. ८ येथील कोटला मैदानावर २४३ भूम-परांडा-वाशी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या प्रचारार्थ शिवसेनेचे प्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भव्य जाहीर सभा घेतली. या सभेत मुख्यमंत्र्यांनी तानाजीराव सावंत यांना पुन्हा आमदार करण्याची खात्री दिली आणि त्यांना "नामदार" करण्याची जबाबदारी स्वतः घेतली. मुख्यमंत्र्यांनी या मतदारसंघाचा ३५ वर्षांचा बॅकलॉग भरून काढण्याची ग्वाही देत मतदारांना महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले. 

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, तानाजीराव सावंत यांनी राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून आरोग्य विभागात केलेल्या क्रांतिकारी कामामुळे त्यांचे कौतुक "गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स" मध्ये देखील झाले आहे. त्यांनी सावंत यांच्या कामाचा गौरव करत सांगितले की, मतदारसंघात विकासकामे करण्यासाठी दोघांचे मनगट मजबूत आहे. उजनी धरणाचे सात टीएमसी पाणी सीना-कोळेगाव धरणात गुढीपाडव्याला पोहचेल, असे आश्वासन देखील दिले त्याचबरोबर, शिंदे यांनी सावंत यांचे काम विशेष कौतुकास्पद ठरवत त्यांना 'जादूगार' संबोधले. त्यांच्या नेतृत्वात दोन्ही सरकारच्या काळातील प्रकल्पात पुढाकार घेऊन दोन हजार कोटीचा निधी खेचल्याचे सांगून सावंत यांच्या नेतृत्वाचे समर्थन केले.शिंदे यांनी उद्धव ठाकरेवर अप्रत्यक्ष टीका करत, बाळासाहेब ठाकरे यांचे बाण आणि शिवसेनाचा सन्मान जपण्याचे काम महायुतीचे सरकार करत आहे, असे सांगितले. तसेच त्यांनी शिवसेनेला काँग्रेसच्या आघाडीशी बांधण्याच्या विरोधात उठाव केल्याचे स्पष्ट केले. 

मुख्यमंत्री शिंदे यांनी 'लाडक्या बहिणींच्या' योजना व शेतकऱ्यांसाठीच्या योजनांचा उल्लेख करून महायुती सरकारची लोककल्याणकारी भूमिका अधोरेखित केली. सभेला उपस्थित प्रमुख नेत्यांमध्ये आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता साळुंखे आणि महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. महायुतीच्या उमेदवार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी देखील या प्रसंगी त्यांच्या विकासकामांची यादी सादर केली. त्यांनी पाण्याचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले. त्याचबरोबर त्यांनी मतदारांना धनुष्यबाण चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन केले. 

सभा सुरूवातीला भाजप नेते सुजितसिंह ठाकूर यांनी माजी आमदार राहुल मोटे यांच्यावर टीकास्त्र सोडले. पाशा पटेल यांनी सोयाबीनच्या भावासंदर्भात लवकरच तोडगा निघेल, असा दिलासा शेतकऱ्यांना दिला.मुख्यमंत्री शिंदे यांनी शेवटी, सरकारची योजनांची ग्वाही देत लाडक्या बहिणींचे मानधन वाढविणे, शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि इतर लोककल्याणकारी योजना लागू करण्याचे आश्वासन दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध