Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २५ ऑक्टोबर, २०२४

चंद्रकांत रघुवंशींच्या भूमिकेकडे सर्वांचेच राजकीय लक्ष सर्वच पातळीवर राजकीय चर्चाना उधाण धुळे नंदुरबार सह साक्रीची ही जबाबदारी महत्त्वाची.



विधानसभेच्या निवडणुका घोषित झाल्या आहेत.त्यात विधानसभेच्या नंदुरबार मतदार संघासह जिल्ह्यातील चारही मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल करणे,उमेदवारी घोषित होणे या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. हे सर्व प्रशासकीय काम सुरू असतानाच राजकीय पटलावर माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे.
सध्याची राजकीय स्थिती केवळ नंदुरबार जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात विचित्र अशी झाली आहे.जे पक्ष परस्परांचे मित्र आहेत त्याच पक्षांचे पदाधिकारी स्थानिक पातळीवर एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले दिसतात. जसे की पूर्वीपासून शिवसेना (उबाठा) यांचे आणि कॉंग्रेसचे फारसे जुळत नाही,ते पक्ष आता एकमेकांचा प्रचार करतील.तोच प्रकार भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या संदर्भात आहे.या तिन्ही पक्षाचे स्थानिक पातळीवर फारसे सख्या नाही.काहीसे अजित पवार गटाचे डॉ.अभिजीत मोरे जुळवून घेतात.माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी यापूर्वी अनेक निवडणुकांमध्ये विद्यमान आमदार डॉ.विजयकुमार गावित यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे.एका निवडणुकीत त्यांचे वेल्डिंग झाले होते.मात्र ते वेल्डिंग तात्पुरते राहिले,पूर्ण पाच वर्षे टिकले नाही.एका निवडणुकीत सरळ दे धक्काचा प्रयोग करीत माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी तत्कालीन भाजपा उमेदवाराला खुला पाठिंबा दिला होता.त्यावेळीही डॉ.गावीत विजयी झाले होते.
आता डॉ.गावित हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत.शिंदे गटाचे पदाधिकारी असलेले माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी हे भारतीय जनता पक्षाच्या मित्र पक्षाचे पदाधिकारी आहेत.त्यामुळे महायुती धर्म पाळत माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी हे डॉ.गावित यांचा प्रचार करतात की त्यांच्या विरोधात भूमिका घेतात हे नजीकच्या काळात स्पष्ट होईल.लोकसभा निवडणुकीच्या काळात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ.हिना गावित यांच्या विरोधात कॉंग्रेसने भूमिका घेतली आणि काही गट देखील फुटले.त्यात माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी ‘नरो वा कुंजरो वा’ची भूमिका घेत डॉ.हिना गावीत यांच्या उमेदवारी पासूनच विरोध दर्शवला होता.मात्र त्यानंतर ते खुल्या पद्धतीने बाहेर आले नाहीत.
विधानसभेच्या निवडणुकीत माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची भूमिका नेमकी काय राहते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.एकीकडे नंदुरबारला विरोध करायचा,दुसरीकडे नवापूरला वेगळी भूमिका घ्यावी लागेल तर तळोदा शहाद्यात मैत्रीचे नाते जोपायचे की धडगावमध्ये जुनी मैत्री कायम ठेवायची अशा सर्वच पातळीवर चर्चा सुरू आहे.

एकाच घरात दोन झेंडे ?

एकेकाळी कॉंग्रेसमधील घराणेशाही हा विरोधी पक्षांच्या निवडणूक अजेंड्यावरील एक महत्त्वाचा मुद्दा असायचा.परंतू कालांतराने सर्वच पक्षात घराणेशाहीचे पीक मुबलक आले.अलीकडच्या काळात लोकशाहीपेक्षा घराणेशाहीच अधिक समृद्ध आहे.आता आपल्या पक्षातला कोटा फुल झाल्याने काही नेत्यांनी दुसर्‍या पक्ष प्रमुखांचे उंबरठे झिजविले.यामुळे राज्यातील काही मतदार संघाप्रमाणेच आपल्या जिल्ह्यातही एकाच घरात दोन झेंडे दिसतील असे देखील बोलले जात आहे.लोकसभेच्या पराभवाने डॉ.हिना गावीत ह्या पराभवाचा बदला घेण्यासाठी धडगांव मतदार संघाचे आमदार ऍड.के.सी.पाडवी यांच्या विरोधात निवडणूक लढविण्यास इच्छूक आहेत.यासाठी त्यांनी शिंदेगटाकडे उमेदवारीची मागणी केल्याचे बोलले जात आहे.याच जागेसाठी शिंदेगटाचे जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे,जि.प.सदस्य विजय पराडके हे देखील इच्छूक आहेत.दरम्यान आ.आमशा पाडवी यांना महायुतीकडून उमेदवारी दिल्याचीही चर्चा आहे.मा.आ.चंद्रकांत रघुवंशी हे शिवसेनेचे (शिंदेगट) नंदुरबार-धुळे जिल्हा संपर्कप्रमुख असल्याने येथे देखील त्यांची भुमिका महत्त्वाची ठरणार आहे.

अखेर काय होणार ?

काहीही झाले तरी महायुतीचा धर्म पाळत माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना या निवडणुकीत डॉ.विजयकुमार गावित यांच्या विरोधात खुली भूमिका घेता येईल असे वाटत नाही.वरिष्ठ पातळीवरुन नेत्यांनी देखील विधानसभेच्या नंदुरबारसह शहादा,अक्कलकुवा,नवापूर आणि साक्री मतदारसंघाची जबाबदारी श्री.रघुवंशी यांच्यावर सोपवली असल्याचे सांगण्यात येते.तसे वास्तव असेल तर महायुतीचा धर्म पाळावा लागेल आणि नजीकच्या काळात तसे घडेल असे संकेत मिळत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध