Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १८ सप्टेंबर, २०२४

गणेश विसर्जन मिरवणुकीत धुळ्यात मोठी दुर्दैवी घटना ट्रॅक्टरखाली आल्याने 3 चिमुकले ठार



धुळे प्रतिनिधी - राज्यात सर्वत्र गणेश विसर्जन सुरू असताना धुळे जिल्ह्यातून मात्र अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद घटना समोर आली आहे. 

धुळे शहरापासून जवळ असलेल्या चितोड गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टरखाली आल्याने तीन बालके जागीच ठार झाली आहेत. परी बागुल, शेरा सोनवणे, लड्डू पवार अशी त्यांची नावे आहेत.

विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टरवरील चालक बदलताना हा अपघात झाला. या दुर्घटनेत सहा जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर भाऊसाहेब हिरे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी एकाची स्थिती गंभीर आहे. त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गाव शोकाकुल झाले आहे. ट्रॅक्टरवर चढून ड्रायव्हरने तो सुरू केला, मात्र या ट्रॅक्टरच्या आजुबाजूला असलेल्या तीन चिमुकल्या मुलींच्या अंगावरुन हा ट्रॅक्टर गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. उभ्या असलेल्या ट्रॅक्टरजवळ या मुली खेळत असताना हा भीषण अपघात घडला आहे. या घटनेमध्ये एक महिला देखील गंभीरित्या जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच इतर पाच ते सहा जणांचा देखील दुखापत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे, हा अपघात नेमका कसा झाला, गाडीच्या ड्रायव्हरच्या लक्षात कसे आले नाही, याचा तपास सध्या सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकाऱ्यांनी चितोड गावात धाव घेत पाहणी सुरू केली तसेच ट्रॅक्टर देखील पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. यासोबतच ट्रॅक्टर चालकाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये एक मुलगी 4 वर्षांची, एक 7 आणि एक 14 वर्षांची, अशा तीन मुली असून एक महिला देखील गंभीररित्या जखमी झाली आहे. याप्रकरणी, पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असून घटना नेमकं कशी घडली, याचा तपासही सुरू करण्यात आला आहे.

दरम्यान, आज सर्वत्र गणेश विसर्जन मिरावणुकी सुरू झाल्या असून राज्यभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र यातच चितोड गावात झालेल्या या आपघातामुळे संपूर्ण गावात स्मशान शांतता पसरली आहे. या घटनेमुळे धुळे जिल्ह्यात शोक कळा पसरली आहे.

दरम्यान धुळे जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणूक कार्यक्रमात मंडळांना अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध