Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, ४ सप्टेंबर, २०२४

शिरपूर येथे मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट, अस्तित्व च्या वतीने साजरा होतोय 1 हजार 8 शाडू मातीचे पर्यावरण पूरक ऐतिहासिक गणेश उत्सव,



शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर येथे मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट, अस्तित्व च्या वतीने आमदार काशिराम दादा पावरा व कु. द्वेता भूपेशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून 1 हजार 8 शाडू मातीचे पर्यावरण पूरक ऐतिहासिक गणेश उत्सव साजरा करण्यात येत असून अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या सर्व 1,008 गणराज मूर्ती मार्फत करवंद येथील पर्यटन क्षेत्र व वन क्षेत्रात वृक्ष बिजारोपण करण्यात येणार आहे.


या निमित्त भव्यदिव्य स्वरूपात 5 सप्टेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता गणपती आगमन रॅली आर. सी. पटेल आश्रम शाळा चोपडा जीन पासून गुजराथी कॉम्प्लेक्स, पाच कंदिल, मारवाडी गल्ली, कुंभार टेक, नगर परिषद मार्ग, गायत्री मंदिर येथून आर. सी. पटेल मेन बिल्डिंग पर्यंत ढोल ताश्यांच्या गजरात व हजारो विद्यार्थ्यांच्या सहभागातून काढण्यात येत आहे. तसेच 7 सप्टेंबर रोजी आर. सी. पटेल मेन बिल्डिंग मध्ये श्री गणेश प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 9 सप्टेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता आर. सी. पटेल मेन बिल्डिंग पासून गायत्री मंदिर, सोनवणे वकील बंगला, करवंद नाका, आमदार कार्यालयाच्या पुढे तपन पटेल मार्ग याप्रमाणे गणपती विसर्जन रॅली काढण्यात येणार आहे. यानंतर 1, 008 गणपती मूर्ती सह शिक्षक, प्राचार्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी हे करवंद येथील वनक्षेत्रात वृक्षारोपण करण्यासाठी पुढे सरसावतील.

आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी शाडू मातीचे गणपती बनविले असून याच गणेश मूर्तीमध्ये विविध वृक्ष जातीचे बीज रोपण करून करवंद येथील वनक्षेत्रात या सर्व 1,008 गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. म्हणजेच अतिशय अभिनव पद्धतीने श्री गणेश मूर्तींच्या विसर्जनातून वृक्षारोपण मोहीम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे.

श्री गणेश आगमन व श्री गणेश विसर्जन रॅलीमध्ये सजविलेल्या वाहनांमधून शाडू मातीच्या एक हजार आठ गणेश मूर्तींसह विद्यार्थी, नाद कृष्ण ढोल ताशा पथक, आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलाच्या व एस.व्ही.के.एम.संस्थेच्या विविध शाळांचे बँड पथक आरती डान्स ग्रुप, झेंडा डान्स, टाळ डान्स, लेझीम डान्स, स्काऊट-गाईड पथक, बुलबुल पथक तसेच इस्कॉनच्या गणेश उत्सव विविध झाक्या सहभागी होतील.

माजी मंत्री आमदार तथा श्री विलेपार्ले केळवणी मंडळ मुंबई अध्यक्ष अमरिशभाई पटेल व सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून शिरपूर शहर व तालुक्याला पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण तालुका बनविण्याचा दृढ़निश्चय करण्यात आला आहे.

गेल्या वर्षी महाराष्ट्र शासनाने 7 वर्षांसाठी श्री विलेपार्ले केळवणी मंडळ, मुंबई या संस्थेसह मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्टला मौजे करवंद ता. शिरपूर येथील 62 एकर अवनत वनक्षेत्र वनीकरण करण्यासाठी बहाल करण्यात आले आहे. आतापर्यंत तिथे 18 हजार वृक्ष लागवड यशस्वीरित्या झाली आहे. यात आता पर्यावरण पूरक 1,008 गणपती बिजारोपणाची भर पडणार आहे. पटेल परिवारातर्फे शिरपूर तालुक्याच्या निरोगी भवितव्यासाठी पर्यावरण पूरक" ड्रीम प्रोजेक्ट" साकारण्यात येत आहेत. म्हणजेच करवंद येथील 62 एकर वनक्षेत्र हिरवाईने नटणार असून ही तालुक्यातील जनतेसाठी खूप गौरवपूर्ण बाब आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध