Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २७ जुलै, २०२४

दहिवद येथे भर पावसाळ्यात वृक्ष तोड, समाजिक वनीकरण विभागाचे व वनविभागाचे दुर्लक्ष !

 


 

अमळनेर प्रतिनिधी : वृक्षांमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो. त्यामुळे पर्यावरणाचा होणारा -हास रोखण्यासाठी वृक्षतोड थांबणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे नवीन वृक्षारोपण करण्यासोबतच वृक्षतोड रोखण्याकडेही  विशेष लक्ष दिले गेले पाहिजे. अत्यावश्यक कारणासाठी जरी एखादे झाड तोडणे गरजेचे असले अथवा वृक्ष छाटणी करावयाची असेल तरी अनेकदा अशाप्रकारची परवानगी  न घेताच वृक्ष तोड करणे अथवा वृक्ष छाटणी करण्यात येत असल्याचे दिसून येते

 

असाच प्रकार भर पावसात दहिवद येथे घडतांना दिसून आला आहे. दहीवद टाकरखेडा रस्त्यालगत बेसुमार ,बेकायदेशीर पद्धतीने  निम,खैर ,अंजन अश्या वृक्षांची वृक्षतोड होत आहे .बेकायदेशीर वृक्ष तोड होत असतांना  सामाजिक वनिकरण व वनविभागाचे  अधिकारी,कर्मचारी मात्र झोपा काढत असल्याचे चित्र आहे.

 

दहिवद येथे वृक्ष मित्र पंकज पाटील यांच्या संकल्पनेतून गांव पर्यावरण पूरक करण्यासाठी २०१२ पासून सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. २०१२ पासून ते २०१९ पर्यंत पंकज पाटील यांनी गावांत महादेव मंदिर परिसर ,छत्रपती शिवाजी महाराज चौक ,अमरधाम येथे हजारो झाडे जगवली. तसेच गावरान क्षेत्रात २६ जुलै २०१८ साली कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानाच्या स्मरणार्थ  एका मिनटात १००८ वृक्ष लावण्याचा ग्रामीण भागातील पाहिला प्रयोग केला व तो यशस्वी देखील करून दाखवला. तेव्हा पासूनच तालुक्यात वृक्ष चळवळ उभी राहिली .

 

त्यानंतर लोकनियुक्त सरपंच सुषमा वासुदेव पाटील यांनी २०२१ साली महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत एकाच वेळी  ११ हजार झाडे लावण्याचा ग्रामीण भागातील विश्व विक्रम केला . ११ हजार झाडांच्या संगोपनासाठी गावांतील महिला बचत गटाच्या माध्यमातून ४४० कुटुंबाना रोजगार उपलब्ध करून दिला. एकाच वेळी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या ११ प्रशासकीय मान्यता मिळवण्याचा महाराष्ट्रातील पहिला प्रयोग त्यांनी यशस्वी करून दाखवला. आज ती सर्व झाडे जिवंत असून त्यांच्या अनमोल कार्याची ग्वाही देतात .त्यांच्याच पाऊलावर पाउल ठेवत प्रभारी सरपंच यांनी देखील सात हजार झाडे लावून वृक्षारोपण कार्यात अनमोल कार्य  केले .गावातील गरीब जनतेला रोजगार उपलब्ध करून दिला .दहिवद गावांत सामाजिक कार्यकर्ते वृक्ष मित्र पंकज पाटील व ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून सुमारे पन्नास हजार झाडांची लागवड होवून संवर्धन झाले.गावाने पर्यावरण पूरक गावाकडे वाटचाल केली .

 

सामाजिक वनिकरण व वनविभागाचे अधिकारी यांच्या उदासीनतेमुळे आज दहिवद गावातच नव्हे तर संपूर्ण अमळनेर तालुक्यात वृक्षतोड सुरु आहे ,वृक्षतोड करणारे लोकांचे सामाजिक वनीकरण व वन  विभागातील अधिकारी ,कर्मचारी यांच्याशीच लागे-बांधे असल्याने उन्हाळ्यात तर सोडा भर पावसाळ्यात देखील वृक्षतोड होत आहे.सामाजिक वनिकरण व वनविभागाचे अधिकारी यांचे पाठबळ असल्याशिवाय वृक्षतोड करणारे एवढी हिमत करतील का ? म्हणजे एकीकडे सामाजिक क्षेत्रातील विकास मंच ,अंबरीष महाराज टेकडी ग्रुप,लॉंयन्स क्लब यांच्या सारख्या वृक्ष प्रेमी संस्थाकडून वृक्ष लागवड व संवर्धन होत आहे. याउलट सामाजिक वनीकरणाचे व वनविभागाचे वृक्षारोपण तर होतच नाही पण वृक्षतोडीस देखील आर्थिक हितसंबध ठेवून पाठबळ होत आहे का ? असा सवाल निर्माण होत आहे.

 

एरव्ही नेहमी दहिवद गावांत लाकूड कापणाऱ्या मशीनचा आवाज कानात येत असतो पण सर्व सामान्य माणसाच्या अधिकार क्षेत्रात नसल्याने त्यांना  रोखेल कोण ? विशेष म्हणजे तालुक्यात नंबर प्लेट असलेल्या गाड्यांना देखील पोलीस हात देवून थांबवून घेत्तात व दंड ठोकतात. पण लाकडाची गाडी विना नंबर असतांना देखील सहज सोडली जाते तिला अडविण्याचे धाडस का होत नाही ? 

 

 

सामाजिक वनीकरण व वनविभागाचे   काम वृक्षारोपण करणे व बेकायदेशीर वृक्षतोडीस पायबंध घालणे असे असतांना सामाजिक वनीकरणाची व वनविभागाची लागवड झालेली  झाडे जगली असल्याचे चित्र तालुक्यात अजून तरी कोणी पाहिलेले नाही.वृक्ष तोडीस पायबंद घालण्यासाठी देखील त्यांच्या कोणत्याच कायदेशीर उपाय योजना नाहीत . दहिवद येथील बेसुमार ,बेकायदेशीर  वृक्षतोड त्वरित न थांबल्यास सामाजिक वनीकरण व वन विभागाच्या या भोंगळ  कामकाजा विरोधात वृक्ष मित्र पंकज पाटील जिल्हाधिकारी जळगांव यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे समजले आहे .

 

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध