Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २९ जुलै, २०२४

मंत्री अनिल पाटील यांनी अमळनेर तालुक्यातील तुतारीचा आवाज केला बंद...?

 


अमळनेर i उपसंपादकशामकांत पाटील    

 

अमळनेरचे आमदार व राज्याचे मुदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी तुतारीचा भोंग्यात बोळा कोंबल्याने तुतारीचा आवाज चांगलाच बंद केला असल्याचे चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे .या निमित्ताने मंत्री अनिल पाटील यांनी तालुक्यातील वातावरण चांगलच तापवल आहे. जळगांव येथील शरद पवार यांच्या निष्ठावंत संवाद मेळाव्यात साहेबराव पाटील यांनी हजेरी लावल्याने ते अमळनेर विधानसभा निवडणुकीत उभे राहतील व तालुक्यात तिरंगी लढत होईल असे चित्र निर्माण झाले होते .

 

साहेबराव पाटील यांनी हाती तुतारी घेतल्याने  शरद पवार गटातील कार्यकर्ते व कांग्रेस पार्टीतील कार्यकर्ते चांगलेच उत्साहात होते .मात्र तालुक्यातील मुरंबी राजकारणी ,आमदारकीच्या उमेदवारीत तालुक्यात दोन वेळा झालेला पराभव, व नंतर मिळवलेला  विजय त्याच  पंचवार्षिक मध्ये मिळालेले मंत्री पद याचा दांडगा अनुभव घेत  अनिल पाटील यांनी साहेबराव पाटील यांना धुळे येथील कृष्णाई हॉटेल मधील निमंत्रण देवून तालुक्यातील जनतेला पुन्हा हे दाखवून दिले राजकारणात एका क्षणात काहीही घडू शकते .

 


आज रोजी  राजवड येथे साहेबराव पाटील यांच्या  घरी जावून घेतलेली भेट व सपत्नीक घेतलेला साहेबराव पाटील यांचा आशीर्वाद यावरून तालुक्यातील येणाऱ्या विधानसभा निवडणूकीचा अडसर त्यांनी अत्यंत खुबीने व विनयशिलतेने बाजूला केलेला असल्याचे चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे.

 


त्याच बरोबर माजी आमदार शिरीष चौधरी हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असल्याने आणि आमदार असताना युती सोबत ,त्यांनतर देखील युतीच्या नेत्यांसोबत होते.  महायुतीच्या विरोधात लढण्यापूर्वी त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न होऊ शकतात. त्यांना स्थानिक स्वराज्य विधानसभा किंवा राज्यपाल नियुक्त आमदार बनवल्यास त्यांची माघारीची तयारी असल्याची चर्चा आहे . निश्चितच असे घडणार अश्या घडोमोडी घडतील .त्यामुळे तालुक्यातील  कार्यकर्त्यांनी डोक्यावर बर्फ ठेवूनच नारे बाजी केलेली योग्य असणार आहे.  तिकडे प्रकाशभाई पाटील भाजपची उमेदवारी मिळाल्यास लढतील ? महायुती असल्याने ती शक्यता कमी असल्याने त्यांच्याही गोटात शांतता आहे .ते सुरुत कडून इकडे फिरकणार नाहीत याची देखील व्यवस्था मंत्री अनिल पाटील यांनी केलेली असल्याची चर्चा तालुक्यात आहे.

 


राज्यात मोदी आणि युती विरोधात वातावरण असताना अमळनेरात मात्र विद्यमान खासदार  फुटल्यावरही महायुतीने प्रचंड मते घेतल्याने महायुतीची स्थिती आज सुद्धा बळकट आहे. दुसरीकडे बिल्डर  क्षेत्रात असलेले प्रशांत निकम राजकारणात प्रथमच उतरले नुकताच त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश घेतला विधानसभा लढण्यासाठी त्यांना तयारीला दोन महिने अपूर्णच म्हणावे लागतील त्यांना बळ मिळण्यासाठी महाविकास आघाडीचे संपूर्ण सहकार्य पाहिजे आणि तसे चित्र आज तरी नाही. 

 

राजकारणात केव्हाही काही  होऊ शकते , चर्चा बैठकी होणारच ,एकमेकांचे सहकार्य घेऊन ,कार्यकर्त्यांचे सहकार्य घेऊन आग्रह ,तडजोडी होणारच. त्यामुळे आगामी काळात आणखी काही नवीन घडामोडी झाल्यास आश्चर्य वाटायला नको . आज तरी मंत्री अनिल पाटील यानी विधानसभा निवडणुकीपूर्वी समोर असणारे सर्व अडथळे दूर केलेले आहेत . त्यांचे पारडे तालुक्यात जड असून एका रात्रीत त्यांनी सर्व चित्र बदलवून टाकले आहे .अमळनेरच्या विधानसभा निवडणुकीची पूर्ण हवाच त्यांनी काढून टाकल्याने जनता संभ्रमात आहे. तुतारीचा शांत झालेला आवाज कार्यकर्त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागलेला  आहे.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध