Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २२ मार्च, २०२४

धुळे लोकसभेसाठी कर्तृत्व,संयम,दूरदृष्टिकोन असे,तिहेरी यश मिळवत खा.डॉ.सुभाष भामरे यांच्या यशाचा राजमार्ग कायम राहणार !!



धुळे - म्हणतात ना, राजकारण करतांना काय बोलावे यापेक्षा काय बोलू नये, याला जास्त महत्त्व असते. त्याचबरोबर राजकारणात वावरतांना स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास आणि येणार्‍या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी बाळगलेला संयम महत्त्वाचा ठरतो. ज्याने हा संयम पाळला तोच यशस्वी होतो. राजकारण व सत्ताकारण ही फक्त लोकप्रियता संपादन करण्याची खेळी नसते. तिथे जनतेने जबाबदारी सोपवली, तर कारभार करण्याची वेळही येत असते. त्या जबाबदारीला सामोरे जातांना कुठल्याही विषयावर बोलतांना जपून मात्र स्पष्टपणे आपले मतप्रदर्शन करणे भाग असते. नुसत्याच गर्दीच्या टाळ्या मिळवण्यासाठी वादग्रस्त विधाने करून भागत नाही, की त्या जबाबदारीतून सुटता येत नाही.याची पूरेपूर जाणीव ठेवत खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी तिसर्‍यांदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपली हॅट्ट्रिक साधण्यासाठी स्वपक्षासह महायुतीतील शिवसेना (शिंदे गट)- राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) आदी पक्षांच्या नेते-पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेत आपले काम नियोजनबद्ध पद्धतीने सुरू केल्याचे दिसून येते. या धबडग्यात त्यांच्या उमेदवारीविषयी विविध माध्यमांतून मुद्दामहून पसरविल्या जात असलेल्या अफवा आणि घडवून आणल्या जात असलेल्या नकारात्मक चर्चांकडे त्यांनी संयमाने केलेले दुर्लक्ष ठळकपणे दिसून येत आहे.
खासदार डॉ.सुभाष भामरेंच्या
अपप्रचाराचा अजेंडा कशासाठी ?
राजकारण म्हटले, की मते-मतांतरे आलीच. त्याशिवाय लोकशाहीलाही महत्त्व उरत नाही. त्यातच आता लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या रणधुमाळीत तर जो- तो आपापल्या परीने मते व्यक्त करत आहे. भाजपसह अनेक राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणाही केली आहे. राज्यातही भाजपने पहिल्या टप्प्यात २० उमेदवारांच्या नावांची घोषणा करत आघाडी घेतली. अपवाद वगळता गेल्या वेळी विजयी झालेल्या उमेदवारांवरच पक्षश्रेष्ठींनी विविध मतांचा मागोवा घेत विश्वास व्यक्त केला आहे. यात लोकसभेच्या धुळे मतदारसंघातून तिसर्‍यांदा पक्षाने खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. खासदार डॉ. भामरे यांनी आपल्या मतदारसंघात गेल्या १० वर्षांत केलेल्या विकासकामांच्या बळावरच त्यांना हॅट्ट्रिक करण्याची संधी पक्षाने दिली, याबाबत कुणाचेही दुमत असू नये. तरीही त्यांच्या उमेदवारीवरून अद्याप कवित्व संपायला तयार नाही. काही असंतुष्ट वेगवेगळ्या माध्यमांतून चर्चा घडवून आणण्याचा आटोकाट प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. संबंधितांचा हा केविलवाणा प्रयत्न का आणि कशासाठी सुरू आहे, हे लपून राहिलेले नाही. हा प्रकार खासदार डॉ. भामरे यांना उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीपासूनच सुरू आहे. त्यावेळीही खासदार डॉ. भामरे यांनी प्रसिद्धिमाध्यमांच्या अशा प्रश्नांवर कुठलेही अतर्क्य मत प्रदर्शित न करता राखलेला संयम आणि आताही सुरू असलेल्या या बिनकामांच्या चर्चांवर सुद्धा तेच धोरण कायम ठेवत आपल्या स्तरावर समाजातील विविध घटकांच्या गाठीभेटी घेत आपले चिन्ह रुजविण्याला प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे.

पक्षनेतृत्वाचा डॉ.भामरेंच्या कर्तृत्वावर विश्वास
भाजपने दुसर्‍या टप्प्यात महाराष्ट्रातील २० उमेदवारांच्या नावांची घोषणा केली.ही नावे जाहीर करताना पक्षश्रेष्ठींनी बराच वेळ घेतला. यात त्यांच्या पातळीवरही त्यांनी विविध मते जाणून घेतली असणारच, उमेदवारांच्या निवडून येण्याच्या क्षमतेवरही विचार केला असणारच.मात्र,या प्रतीक्षेमुळे राज्यातील चर्चेत असणार्‍या विविध मतदारसंघांतील उमेदवारांबाबतही वेगवेगळ्या चर्चा झडत होत्या. याला धुळे मतदारसंघही अपवाद नव्हता.विद्यमान खासदार डॉ.सुभाष भामरे यांची उमेदवारी कापली जाणार, त्यांनी वयाची सत्तरी ओलांडल्याने त्यांना पुन्हा संधी मिळणार नाही,त्यांच्याविषयी पक्षातच अनेकांची नाराजी आहे, त्यांच्याविषयी जनतेमध्ये रोष आहे, अशा अनेक वावड्या उठविण्यात आल्या.यावर प्रसिद्धिमाध्यमांच्या प्रतिनिधींकडून खासदार डॉ. भामरे यांच्याकडे उमेदवारीबाबत वारंवार विचारणा होत होती.त्यावर डॉ.भामरे हे सातत्याने संयमी वृत्तीने उत्तर देत होते ते म्हणजे पक्ष नेतृत्वाने माझ्यावर विश्वास दाखवत मला सलग दोन वेळा खासदार बनविले.या खासदारकीच्या कार्यकाळात मी प्रामाणिकपणे मतदारसंघात सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेसह मतदारसंघातील सिंचनाचे प्रश्न,धुळे-नरडाणा रेल्वेमार्ग,धुळेकरांसाठी अक्कलपाडा पाणी योजना,भूमिगत गटारांसाठी व रस्त्यांसाठी अमृत एक व दोन योजनेंतर्गत धुळ्यासह अन्य शहरांसाठी आणलेला कोट्यवधी रुपयांचा निधी, त्यातून झालेली विकासकामे, राष्ट्रीय महामार्गांचे जाळे, धुळे रेल्वेस्थानकाचे सुशोभीकरण, धुळेकरांसाठी धुळे ते मुंबई थेट रेल्वे आदी कामांचे दाखले देत स्वतःच्या कर्तृत्वावर व जनतेवर विश्वास व्यक्त करत उमेदवारी आपल्यालाच मिळेल,हे ठामपणे सतत नमूद करत होते.
खा.डॉ.भामरेंची पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज
या काळात समाजात वावरताना खासदार डॉ. सुभाष भामरे यांची बॉडी लँग्वेज अर्थात देहबोली ही इतकी सकारात्मक होती,की त्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांच्या उमेदवारीविषयीच्या तर्क-वितर्कांना उगीचच महत्त्व दिले जात असल्याचे जाणवत होते.आणि हे ज्यांना समजत होते ते त्यांच्या उमेदवारीविषयी निश्चिंत होते आणि झालेही तसेच.पक्षाने त्यांनी केलेल्या विकासकामांचे महत्त्व जाणत तिसर्‍यांदा हॅटट्रिक करण्याची संधी त्यांना दिली आहे.या संधीचे डॉ. सुभाष भामरे यशात रूपांतर करतील,अशीही चर्चा आता संपूर्ण मतदारसंघात रंगत आहे.

तथ्यहीन चर्चांना मुद्दाम उधाण
खा.डॉ. सुभाष भामरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता त्यांच्या उमेदवारीबाबतचे कवित्व संपायला हवे होते. मात्र, नाही. उमेदवारी जाहीर होऊन आठ दिवसांचा कालावधी उलटला, पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले, तरी असंतुष्टांकडून त्यांच्या उमेदवारीबाबत सोशल मीडिया, विविध प्रसारमाध्यमांतून अनेक वावड्या उठविल्या जात आहेत.यात संबंधितांकडून भाजपसमोर बंडाचे निशाण,भाजप कार्यकर्त्यांकडून पक्षश्रेष्ठींना उमेदवारी बदलाबाबत इ-मेल,कॉंग्रेसच्या गळाला अमूक-तमूक, या पक्षाचे भाजपसमोर तगडे आव्हान,अशा तर्कहीन व तथ्यहीन बातम्या पेरल्या जात आहेत. यात पक्षाविषयीही शंका घेतल्या जात आहेत.मात्र, तरीही डॉ.भामरे यांनी या सर्व गोष्टी मागे सोडत आणि आपला संयम,दूरदृष्टी कायम ठेवत पक्षातील सर्व नेते-पदाधिकारी,कार्यकर्ते एवढेच नव्हे, तर समाजातील सर्व घटकांना सोबत घेत आपले काम सुरू करत आघाडीही घेतली आहे.

विघ्नसंतोषींचा अजेंडा कशासाठी ?
निवडणूक आयोगाकडून धुळे मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम घोषित होऊन आता तीन-चार दिवस झाले. भाजप-शिवसेना (शिंदे गट)- राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महायुतीचे उमेदवार खा.डॉ.सुभाष भामरे यांनी मतदारसंघात फिरत भेटीगाठींवर भर दिला आहे. यात त्यांनी मतदारसंघातील प्रत्येक भागात केलेली विकासकामे त्यांच्यासाठी उजवी ठरत आहेत. डॉ. भामरे यांना उमेदवारी जाहीर होताच धुळ्यातील सर्व नगरसेवक, पदाधिकार्‍यांनी तसेच महायुतीतील सर्वच घटक पक्षांच्या नेत्यांनी स्वतंत्र बैठका घेत, आपसांतील हेवेदावे विसरून नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासह डॉ. भामरे यांच्या विजयाचा निर्धार केला आहे. विविध समाजांचा, विविध संघटनांचा त्यांना पाठिंबा मिळत आहे. अनेक राजकीय पक्षांतील कार्यकर्ते त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. दुसरीकडे कॉंग्रेस-शिवसेना (उबाठा गट)- राष्ट्रवाद कॉंग्रेस (शरद पवार गट) महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवारीची घोषणा झालेली नाही.ही उमेदवारी करण्यासाठी कुणी पुढे येतानाही दिसत नाही.अशा स्थितीत काही विघ्नसंतोषींकडून महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या उमेदवारीबाबत होणार्‍या अपप्रचाराचा अजेंडा नेमका कशासाठी सुरू आहे आणि तो कोण करत आहे,हे न ओळखण्याइतपत जनता दुधखुळी नक्कीच नाही.
----------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध