Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ४ मार्च, २०२४

वय नव्हे तर कर्तृत्व ठरले भाजप उमेदवारीचा निकष पहिल्या यादीत ४० हून अधिक सत्तरीपार उमेदवार! निष्कलंक, चारित्र्यवान, कार्यतत्पर डॉ.सुभाष भामरेंची हॅट्रीक निश्‍चीत होणार !!



धुळे - भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी नुकतीच जाहिर केली आहे. यात १६ राज्यांतील आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील १९५ उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपच्या या पहिल्या यादीत २८ महिला, ५० वर्षांच्या आतील ४७ आणि ओबीसी समाजातील ५७ उमेदवारांचा समावेश आहे. यात वयाची सत्तरी पार केलेल्या किमान ४० उमेदवारांनाही पुन्हा तिकीट जाहिर झाले असून,अनेक दिवसांपासून सत्तरी पार उमेदवारांचा पत्ता कट होणार ही बाष्कळ चर्चां फोल ठरली आहे.पक्षाने वय नव्हे तर कर्तृत्वाचे निकष लावून उमेदवारी दिली.वयाने जरी ७० पार असले तरी कामाने लोकप्रिय आणि दमदार असलेल्यांना उमेदवारी दिली. त्यामुळेच निष्कलंक चारित्र्य, कुठल्याही वादात आणि आरोपांत न अडकता संपूर्ण मतदारसंघात चौफेर, विकास करणारे धुळ्याचे विद्यमान खासदार डॉ.सुभाष भामरे यांना पक्षाकडून पुन्हा उमेदवारी मिळणारच आणि खासदार डॉ.भामरे खासदारकीची हॅट्ट्रिक करणार असा विश्‍वास आता लोकसभा मतदारसंंघातून व्यक्त होत आहे. 
भारतीय जनता पक्षाने लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी १९५ उमेदवारांची पहिली यादी शनिवारी जाहीर केली.या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह अशा महत्त्वाच्या ३४ केंद्रीय नेत्यांची नावेही आहेत.१९५ उमेदवारांपैकी उत्तर प्रदेशातील ५१, पश्चिम बंगाल २०, मध्य प्रदेश २४, गुजरात १५, राजस्थान १५, केरळ १२, तेलंगणा ९, आसाम ११, झारखंड ११, छत्तीसगड ११, दिल्ली ७, जम्मू-काश्मीर २, उत्तराखंड ३, अरुणाचल प्रदेश २, गोवा, त्रिपुरा, अंदमान-निकोबार व, दिव-दमणमधील प्रत्येकी एका उमेदवाराचा समावेश आहे. यात २८ महिला, ५० वर्षांखालील ४७ नेते आणि ओबीसी समाजातील ५७ उमेदवारांचा समावेश आहे. भाजपने दिल्लीसह काही राज्यांतील जागांचा अपवाद वगळता बहुतांश विद्यमान खासदारांनाच पहिल्या यादीत स्थान दिले आहे.ज्या विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे त्यात अनेकांनी केलेली वादग्रस्त वक्तव्ये कारणीभूत ठरल्याचे दिसते. या पार्श्‍वभुमिवर धुळ्याचे खासदार डॉ.सुभाष भामरे हे कुठल्याही वादात नाहीत उलट भाजपाचे सर्वात मवाळ खासदार म्हणून नावारुपाला आले आहेत. 
भाजपाची विजयी उमेदवारांवरच बाजी 
भाजपने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर करताना विकासाचे धोरण ठेवले आहे, तर काही ठिकाणी धक्कातंत्राचा वापर केला आहे. भाजपने दिल्ली वगळता इतर कोणत्याही राज्यात फारसे मोठे बदल केलेले नाहीत. वादग्रस्त विधानांमध्ये गुंतलेल्या काही खासदारांची यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. सोप्या शब्दांत सांगायचे तर, भाजपच्या हायकमांडने विजयी उमेदवारांवरच बाजी लावली आहे. नवी दिल्लीतील चार जागांवरील विद्यमान खासदारांना डच्चू देत नव्या चेहर्‍यांना संधी दिली आहे.उत्तर प्रदेशातील जाहीर केलेल्या ५१ पैकी ४६ विद्यमान खासदारांना पुन्हा संधी दिली आहे.राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरातमध्येही काही विद्यमान खासदारांना वगळून नवीनऐवजी जुन्याच चेहर्‍यांना मतदारसंघांची अदलाबदल करत संधी दिली आहे. महाराष्ट्रात देखील भाजपा शिवसेना-राष्ट्रवादीच्या मतदारसंघात बदल करणार मात्र भाजपाचे आहे ते खासदार फारसा बदल करणार नाहीत अशीच शक्यता वर्तवली जात आहे. 
जागावाटपामुळे महाराष्ट्रात उशिर
भाजपने शनिवारी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश नाही. याला कारण देखील महाराष्ट्रात भाजप-शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) यांची महायुती आहे. या महायुतीतील जागावाटप अद्याप झालेले नसल्याने महाराष्ट्रातील भाजपच्या उमेदवारांची यादीही जाहीर झालेली नाही. हे जागावाटप पूर्ण होताच तिन्ही पक्ष आपापल्या उमेदवारांची घोषणा करतील. भाजपाचे चाणक्य गृहमंत्री अमित शहा या आठवड्यात महाराष्ट्राच्या दौर्‍यावर येत आहेत, त्यावेळी जागावाटपावर शिक्कामोर्तब होईल आणि भाजपाचे राज्यातील उमेदवार जाहिर होतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. भाजपच्या १६ राज्यांतील उमेदवार यादीकडे पाहिल्यास महाराष्ट्रातील निष्कलंक, चारित्र्यवान, कुठल्याही वादात न अडकता विकासकामांवरच भर देणार्‍या बहुतांश विद्यमान खासदारांनाही उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळेच धुळे लोकसभा मतदारसंघात कोणताही बदल होणार नाही आणि खासदार डॉ.सुभाष भामरे हेच उमेदवार असतील. 
खा. डॉ. भामरेंचे १० वर्षाचे रिपोर्टकार्ड सर्वात प्रभावी 
खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी गेल्या १० वर्षांच्या कार्यकाळात मतदारसंघात अनेक विकासकामे केली असून त्यांचे रिपोर्टकार्ड सर्वात प्रभावी ठरते आहे. यामुळे लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील विद्यमान खासदार तथा माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची उमेदवारीही निश्चित मानली जात असून, याबाबत भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधूनही तशी खात्री दिली जात आहे.त्यांनी आपले निष्कलंक चारित्र्य जपले.त्यांच्यावर कुठल्याही आरोपाचा डाग लागलेला नाही.सुशिक्षित,विनम्र स्वभावातून आणि जनसामान्यांमध्ये मिसळून मतदारसंघाचा चौफेर विकास केला.त्यांनी धुळे, शिंदखेडा तालुक्यांतील शेती ओलिताखाली आणण्यासाठी २५०० कोटी रुपयांची सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजना आणून शेतकर्‍यांना मोठा दिलासा दिला आहे. या प्रकल्पातील जलसाठ्यामुळे धुळे व नरडाणा औद्योगिक वसाहतींमध्ये औद्योगीकरणालाही चालना मिळणार असून, जिल्ह्यातील युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच राष्ट्रीय महामार्गांचे जाळे विणून दळणवळणाची सुविधाही भक्कम केली आहे. मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गांतर्गत धुळे-नरडाणा रेल्वेमार्गाचे काम सुरू करत उद्योगांची निकडही पूर्ण केली आहे.एवढेच नव्हे, तर शिंदखेडा,मालेगाव बाह्य आणि बागलाण या तिन्ही मतदारसंघांतील सिंचनाच्या अनेक वर्षे प्रलंबित प्रकल्पांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणून ती मार्गी लावत त्या-त्या मतदारसंघांतील शेतकर्‍यांनाही शेतीसाठी पाणी उपलब्ध करून दिले आहे.धुळे रेल्वेस्थानकाचे सुशोभीकरण, धुळे शहरासाठीची अक्कलपाडा पाणी योजना असो, की पूर्ण मतदारसंघातील ६०० गावांना जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजना असो, विविध समाजघटकांसाठी त्यांनी उपलब्ध करून दिलेला निधी असो, खासदार डॉ.भामरे यांनी केलेली विकासकामे त्यांचे विरोधकही खुल्या मनाने मान्य करतात, हाच त्यांचा प्लस पॉइंट ठरणार आहे. याशिवाय खासदार डॉ.भामरे यांनी कुठलाही अभिनिवेश न बाळगता विविध पक्षांतील पदाधिकारी,कार्यकर्ते व सर्वसामान्यांची स्वतः लक्ष घालत करून दिलेली कामे त्यांच्यामागे पाठबळ निर्माण करण्यात मोलाचे ठरणार आहे. पक्षाचे संघटनही खासदार डॉ. भामरे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याने खासदार डॉ.भामरे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.एवढेच नव्हे तर खासदार डॉ.भामरे यावेळी हॅट्ट्रिक करणारच असा ठाम विश्वासही जनसामान्यांतून व्यक्त होत आहे.
------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध