Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, १० फेब्रुवारी, २०२४

माजी नगराध्यक्ष रावसाहेब प्रभाकरराव चव्हाण यांचे दुःखद निधन...!



शिरपूर : शिरपूर वरवाडे नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष रावसाहेब प्रभाकरराव तुकाराम चव्हाण यांचे वयाच्या 70 व्या वर्षी 10 फेब्रुवारी 2024 शनिवार रोजी सकाळी 7 वाजता शहरातील माळी गल्ली येथील राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

त्यांची अंत्ययात्रा सायंकाळी 5 वाजता राहत्या घरापासून काढण्यात येऊन शहरातील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, दोन मुली, जावई, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.

रावसाहेब प्रभाकरराव चव्हाण हे आमदार अमरिशभाई पटेल, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या परिवारातील विश्वासू सहकारी व कौटुंबिक सदस्य म्हणून सर्वदूर परिचित होते.

त्यांनी 1985 पासून गेल्या 40 वर्षांपासून शिरपूर वरवाडे नगरपरिषदेत नगरसेवक म्हणून उत्तम कामगिरी बजावली. 2000 पासून धुळे व नंदुरबार जिल्हा सहकारी बँकेवर संचालक म्हणून कार्यरत होते. शिरपूर शहरातील माळी गल्ली येथील श्री क्षत्रिय माळी समाज पंचमंडळ मुख्य मार्गदर्शक तसेच महात्मा ज्योतिबा फुले विधायक मंडळ संस्थापक अध्यक्ष, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे सचिव, आर. सी. पटेल एज्युकेशन ट्रस्ट सचिव, प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे व्हाईस चेअरमन, भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकरिणी विशेष निमंत्रित सदस्य, भारतीय जनता पार्टी शिरपूर तालुका प्रभारी यासह असंख्य पदांवर ते विराजमान होते. माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या सोबत ते राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व विविध क्षेत्रात सक्रिय होते.

11 सप्टेंबर 1954 रोजी अतिशय गरीब व हलाखीच्या परिस्थितीत जन्मलेले रावसाहेब सर्वसामान्यांच्या मदतीसाठी नेहमीच धाऊन जात होते. शिरपूर शहर व तालुक्यासह धुळे जिल्हा, खानदेश, महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात त्यांचा मोठा मित्रपरिवार व मोठ्या प्रमाणात स्नेहसंबंध होता. रावसाहेब गेल्याने सर्वत्र दुःखाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध