Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २९ जानेवारी, २०२४

भारतीय शेतीतील ऑरगॅनिक फर्टीलायझर चे महत्व व वापर ही काळाची गरज



पिकांच्या वाढीसाठी विविध अन्नद्रव्यांची आवश्यकता भासते.त्याची पूर्तता करण्यासाठी विविध सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा वापर केला जातो.मात्र,या सर्व खतांची पिकांना उपलब्धता करण्यामध्ये सूक्ष्म जीवांचे महत्त्वाचे योगदान असते.
पिकास आवश्यक त्या विशिष्ट अन्नद्रव्याची उपलब्धता वाढविणाऱ्या जिवंत किंवा सुप्त अवस्थेतील जिवाणूंच्या निर्जंतुक वाहकामध्ये केलेल्या मिश्रणास जैविक खत असे म्हणतात.
स्फुरद विरघळवणारी जैविक खते
स्फुरद हे पिकांसाठी आवश्यक अन्नद्रव्य आहे. महाराष्ट्रातील जमिनींमध्ये स्फुरदाची उपलब्धता कमी आहे.रासायनिक खतांद्वारे दिल्या गेलेल्या स्फुरदापैकी अल्प स्फुरद पिकांना उपलब्ध होते. बहुतांश स्फुरद जमिनीत स्थिर होते.ते पिकांना घेता येत नसल्याने त्यावरील खर्च वाया जातो. जमिनीत स्थिर झालेले स्फुरद विरघळवण्याचे काम हे जिवाणू करतात.हे जिवाणू प्रति हेक्टरी १५ ते २० किलो स्फुरद विरघळवतात.
पालाश उपलब्ध करून देणारी जैविक खते 
पालाश हे पिकासाठी आवश्यक असलेले अन्नद्रव्य आहे.महाराष्ट्रातील जमिनींमध्ये पालाशचे प्रमाण भरपूर उपलब्ध आहे.मात्र,त्यांपैकी बहुतेक पालाश हे पिकांना उपलब्ध होत नाही. जमिनीत स्थिर झालेले पालाश पिकांना उपलब्ध करून देण्याचे काम हे जिवाणू करतात. 
झिंक विरघळवणारी जैविक खते 
जस्त (झिंक) हे पिकांसाठी आवश्यक असे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे. महाराष्ट्रातील जमिनींमध्ये झिंकची कमतरता आढळते. याच्या कमतरतेचे परिणाम पिकांवर दिसून येतात.या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे अन्य अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेवरही परिणाम होत असल्याने पिकांच्या उत्पादनात घट येते. जमिनीत स्थिरावलेले झिंक विरघळवण्याचे काम हे जिवाणू करतात. 
मायकोरायझा
मायकोरायझा ही पिकांच्या मुळांवर व मुळांमध्ये वाढणारी एक उपयुक्त बुरशी आहे.ती झाडांच्या विस्तारित पांढऱ्या मुळासारखे काम करते.पिकांस अधिक क्षेत्रातून पाणी व अन्नद्रव्य उपलब्ध होतात. स्फुरद, पालाश,नत्र,कॅल्शिअम,सोडिअम,जस्त, व तांबे यासारखी अन्नद्रव्ये जमिनीतून शोषून घेण्यास मायकोरायझा पिकांना मदत करतात.
जिवाणू खते वापरण्याच्या पद्धती व मात्रा 
बीजप्रक्रिया
जैविक खतांची बीजप्रक्रिया करताना १० किलो बियाण्यास १०० मिली जैविक खत वापरावे. प्लॅस्टिकच्या बादलीत १० किलो बियाणे घेऊन त्यात १०० मिली जैविक खतांची मात्रा टाकून हलक्या हाताने सारख्या प्रमाणात बियाण्यास लावावे. त्यानंतर बियाणे थोडा वेळ सावलीत सुकू द्यावे.या प्रकारे एक किंवा जास्त जैविक खतांची प्रक्रिया बियाण्यावर करता येते.सोयाबीन व भुईमूग या बिजांचा पृष्ठभाग नाजूक असतो. या पिकांच्या १० किलो बियाण्यास ५० मिली जैविक खत या प्रमाणात प्रक्रिया करावी.
रोपांची मुळे बुडविणे
ज्या पिकांनी रोपे तयार करून पुनर्लागवड केली जाते, त्या पिकांच्या मुळांवर जैविक खत प्रक्रिया करता येते. जैविक खत १० मिली प्रती लीटर पाणी या प्रमाणे तयार केलेल्या द्रावणामध्ये लागवडीपूर्वी रोपांची मुळे अर्ध्या तासासाठी बुडवून ठेवावीत. नंतर लागवड करावी.
माती किंवा शेणखतामध्ये मिसळून देणे
४०० ते ६०० किलो ओलसर मातीत किंवा शेणखतामध्ये १ लीटर जैविक खत मिसळून रात्रभर ठेवावे.पेरणी किंवा जमिनीस पाणी देण्यापूर्वी हे मिश्रण सरीमध्ये टाकावे.
पिकांच्या मुळांभोवती देणे
उभ्या पिकास जैविक खत फवारणी पंपाचे नोझल काढून मुळाजवळ आळवणी करून देता येते.१ लीटर जैविक खत प्रती २०० लीटर पाणी या प्रमाणे द्रावण तयार करावे.हे द्रावण सकाळी किंवा सायंकाळी पिकांच्या मुळांजवळ द्यावे. 
ठिबक सिंचनाद्वारे देणे
एक एकर क्षेत्रासाठी १ लीटर जैविक खत ठिबक सिंचनाद्वारे पाण्यासोबत मिसळून द्यावे.फळपिके, ऊस,कापूस इ.पिकांना ही पद्धत उपयुक्त ठरते. 
नत्र स्थिर करणारे जैविक खत
रायझोबिअम
रायझोबिअम जिवाणू द्विदल पिकांच्या मुळांवर गाठी निर्माण करून राहतात.ते हवेतील नत्राचे सहजीवी पद्धतीने स्थिरीकरण करून पिकांना उपलब्ध करून देतात. साधारणतः रायझोबिअम जिवाणू प्रति हेक्टरी ५० ते १५० किलोपर्यंत नत्र स्थिर करतात. रायझोबिअम जैविक खत तूर,मूग, उडीद, सोयाबीन,हरभरा,भुईमूग इ.द्विदल पिकांसाठी उपयुक्त ठरते.पीकनिहाय वेगवेगळ्या रायझोबिअम प्रजातींचा वापर करावा लागतो.  
ॲझोटोबॅक्टर
ॲझोटोबॅक्टर हे जिवाणू असहजिवी पद्धतीने हवेतील नत्राचे स्थिरीकरण करतात.ते पिकांना उपलब्ध करून देतात.एकदल तृणधान्यामध्ये उदा.ज्वारी,बाजरी,मका,कापूस,फळे व भाजीपाला पिकांसाठी ॲझोटोबॅक्टर जिवाणूंची शिफारस केली जाते.साधारणतः हे जिवाणू प्रति हेक्टरी १५-२० किलो नत्र स्थिर करतात. 
ॲझोस्पीरीलम
ॲझोस्पीरीलम हे जिवाणू असहजीवी पद्धतीने हवेतील नत्र पिकांना उपलब्ध होईल अशा स्वरूपात जमिनीत स्थिर करतात.एकदल तृणधान्य उदा.मका,बाजरी,गहू,भात,ज्वारी,फळे व भाजीपाला पिकांसाठी ॲझोस्पीरीलम जिवाणूंची शिफारस करतात.हे जिवाणू प्रति हेक्टरी २०-४० किलो नत्र स्थिर   
करतात.
ॲसिटोबॅक्टर
ॲसिटोबॅक्टर हे आंतरप्रवाही जिवाणू असून, शर्करायुक्त पिकांच्या मुळामध्ये आणि पिकांमध्ये राहतात.ते हवेतील नत्र पिकांना उपलब्ध करून देतात.शर्करायुक्त पिके उदा. ऊस,रताळी,बटाटे इ. पिकांमध्ये ॲसिटोबॅक्टर जिवाणू प्रति हेक्टरी ३० ते ३०० किलो नत्र स्थिर करतात.
जैविक खतांचे फायदे 
जमिनीची नैसर्गिक व जैविक सुपीकता टिकवून ठेवते.
पर्यावरणाचा समतोल साधला जातो.
उपयुक्त जीवजंतू आणि मित्र कीटकांना या पासून कोणताही धोका नाही.
सेंद्रिय पदार्थ कुजण्यास मदत होऊन जमिनीचा पोत सुधारतो.
नैसर्गिक पद्धतीने अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते.
पिकांच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होते.
पिकांमध्ये प्रतिजैविकांची वाढ होऊन पिकाची रोग व किडीसाठी प्रतिकारशक्ती वाढते.
जैविक खतांतील संजीवकांमुळे बियाण्याची उगवण क्षमता वाढते.पिकांची चांगली वाढ होते.
जैविक खते तुलनेत स्वस्त असल्याने उत्पादन खर्चात बचत होते.
जैविक खतांचे कुठलेही अपायकारक परिणाम जमीन,पाणी,पीक,आणि जैवविविधतेवर आढळून येत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध