Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २३ जानेवारी, २०२४

मराठा समाजातील वादळ श्री.मनोज जरांगे पाटील सरकारसाठी डोकेदुखी ठरणार.....



मराठा समाजाचे नवे नेते मनोज जरांगे यांचे मुंबईच्या दिशेने आज (दि.२०) आगमन होण्याच्या चर्चेने सरकारला घाम फुटला की नाही,हे समजणे कठीण असले,तरी हिंदी पट्ट्यात मात्र 'कौन हैं ये जरांगे'असा सूर व्यक्त होत आहे.या पक्षातून त्या पक्षात उड्या मारणाऱ्यांऐवजी एखाद्या समाजासाठी करोडो लोकांना एकत्र आणून जागतिक रेकॉर्ड करणाऱ्या मनोज जरांगे यांचे नाव आता देशभर पोहोचले आहे.जसजसे त्यांचे नाव देशभर पोहोचले जात आहे, तसतसे या देशातील राजकीय नेत्यांच्या पोटात गोळा यायला सुरुवात झाली आहे.गुगलवर सर्वाधिक वेळा सर्च केलेला नेता म्हणून आता जरांगे यांचे नाव घेतले जात आहे. कारण,जगात सर्वांत मोठी दीड कोटी लोकांची सभा शेतात घेण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर झाला आहे.एवढेच कशाला, तर एकामागे एक अशा एका दिवसात तीस सभा घेण्याचा रेकॉर्ड आता त्यांच्या नावावर झाले आहे. याचाच दुसरा अर्थ असा की,जगात एकाच दिवसात सर्वाधिक लोकांना संबोधन करण्याचा रेकॉर्डही त्यांच्याच नावावर झाले आहे. इच्छित स्थळी जाताना प्रत्येक चौकात, ठिकठिकाणी गाडीतून खाली उतरून आपल्यावर प्रेम करणाऱ्या सर्वाधिक लोकांना भेटण्याचा रेकॉर्डही त्यांच्याच नावावर झाले आहे.फुटबॉल वर्ल्डकपनंतर यू ट्यूबला सर्वाधिक लोकांनी लाइव्ह पाहिलेला इव्हेंट म्हणजे सराटी अंतरवालीतील सभा होय. मंत्रिपद सोडाच, पण साधे ग्रामपंचायतीचे सदस्य नसतानासुद्धा त्यांच्या मागे-पुढे पोलिसांचा ताफा असतो. असे असलेली एकमेव व्यक्ती होण्याचा रेकॉर्डदेखील जरांगेंच्याच नावावर झाले. तुमच्याकडे शिक्षण,दिसणे,पैसा नसेल तरी तुम्ही इच्छाशक्तीच्या जोरावर ध्येय गाठू शकता अशी सर्वाधिक लोकांना प्रेरणा देण्याचा रेकॉर्ड जरांगेनी केले आहे. स्वतःची दुचाकीदेखील नसताना चाहत्यांच्या वाहनांतून सर्वाधिक प्रवास केलेली व्यक्ती म्हणून त्यांचेच नाव घ्यावे लागेल. आर्थिकदृष्ट्या स्वत:जवळ काहीही नसताना समाजाचा सर्वाधिक विश्वास आणि प्रेम जरांगेंनी मिळविले.कारण पदर खर्चाने सर्वाधिक लोक भाषण ऐकण्यासाठी एकत्रित आणण्यात या माणसाला यश आले आहे.ज्यांच्या एका हाकेवर लाखो लोक जमतात,असे असताना थोडाही अहंकार किंवा डोक्यात हवा न गेल्याने त्यांच्याबद्दल आदर अधिक वाढत गेला. उपोषण लोकशाहीतील सर्वांत प्रभावी अस्त्र आहे, यावर विश्वास ठेवून ते सत्यात उतरविण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांनी केला. उपोषण सोडण्यासाठी पद आणि पैशाची ऑफर असताना, आपल्या मागणीवर ठाम राहून समाजाप्रति आपला प्रामाणिकपणा सिद्ध केल्याने समाजाने त्यांना डोक्यावर घेतले. काही ठिकाणी रात्री नऊची सभा पहाटे चारला झाली तरी एकही श्रोता जाग्यावरून हलला नाही, यालाच जनतेचे प्रेम म्हणतात. आंदोलन काळात लक्ष विचलित होऊ नये म्हणून घराचा उंबरा न शिवण्याचा शब्द खरा केला.'आधी कुटुंब, मग समाज' अशी रीत प्रचलित असताना 'आधी समाज, मग कुटुंब' असे सांगणारी ही एकमेव व्यक्ती असावी. त्यामुळेच भारतातील इतर राज्यांत सर्वाधिक लोकांना प्रश्न पडला आहे, म्हणूनच ते विचारत आहेत की,'कौन है ये जरांगे ?’ अर्थात महाराष्ट्रातच जरांगेंची ओळख अलीकडच्या काळात घराघरांत पोहोचली आहे.त्यामुळे महाराष्ट्राच्या बाहेरील जनतेला 'जरांगे कोण आहे' हा प्रश्न निश्चितच पडणार.यापूर्वी शेतकरी नेते शरद जोशी,राजेश टिकैत,गुजर समाजाचे नेते कर्नल किरोडीसिंह बैसला यांनाही अशीच लोकप्रियता लाभली होती.एकदा लोकप्रियता लाभली की,टीकेचे आसूडदेखील ओढले जातात. जरांगेंवर जेसीबीमधून फुलांचा वर्षाव केल्याने मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास दिसत नाही,अशी खिल्ली उडविली जाते. मंत्री छगन भुजबळ आर्थिकदृष्ट्या अतिशय सक्षम झाले, म्हणजे संपूर्ण माळी समाज सक्षम झाला का ? मुंडे बंधू- भगिनी,जितेंद्र आव्हाड,भागवत कराड, विश्वनाथ कराड यांची संपत्ती पाहून संपूर्ण वंजारी समाज श्रीमंत समजायचा का ? रामदास आठवले, राहुल शेवाळे, संजय बनसोडे करोडपती असतील, तर त्यांचा समाजही तेवढाच मोठा झाला का? चंद्रशेखर बावनकुळे, जयदत्त क्षीरसागर, संदीप क्षीरसागर यांच्याकडे पाहून संपूर्ण तेली समाज पुढारलेला म्हणणेदेखील हास्यास्पद ठरते. जरांगेंवर फुलांचा वर्षाव केला म्हणून संपूर्ण मराठा समाज सुधारलेला आहे असे म्हणणे हास्यास्पद आहे. आपण मंत्री-संत्री असूनही व‌ करोडो रुपये खर्चूनही लोक आपल्या पाठीशी उभे राहत नाहीत, ही राजकीय नेत्यांना खंत असावी.फडणवीस, गडकरी,जावडेकर,गाडगीळ,टिळक,जोशी यांना पाहून संपूर्ण ब्राह्मण समाजाचे ईडब्ल्यूएस आरक्षण रद्द केले पाहिजे का ? तर मुळीच नाही. मराठ्यांनी कधीच कोणाला विरोध केला नाही आणि आज गरजवंत मराठा समाज आपला हक्क मागतोय तर सर्व राजकारण्यांच्या पोटात दुखायला सुरुवात झाली आहे.कारण काय तर या एकट्या वाघाने सर्वांचेच राजकीय अस्तित्व धोक्यात आणलंय.विचारांची लढाई किंवा कोणत्याही हक्कासाठीची लढाई ही सनदशीर व लोकशाही मार्गाने लढली गेली पाहिजे.त्यात शत्रुत्वाची व हिंसक भावना नसावी.सोशल मीडियातील ट्रोल गँग कधीही मुद्यावर व्यक्त न होता बाष्कळ, अश्लील,निराधार,असंस्कृत,व्यक्तिगत बदनामीकारक लिखाण करून अत्यंत वाईट पायंडा पाडत आहे. आपण कुठे चाललोय ? काय साध्य करतोय ? याचा आपण सर्वजण विचार करणार की नाही ? सनदशीर मार्गाने समाजासाठी लढणाऱ्या जरांगेंना त्यांचा लढा लढू द्यावा,हीच अपेक्षा !

*मोम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध