Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, १९ नोव्हेंबर, २०२३

आ.अमरिशभाई पटेल व भूपेशभाई पटेल यांचा शिरपूर तालुक्यासाठी पर्यावरण पूरक "ड्रीम प्रोजेक्ट" : करवंद येथील ६२ एकर वनक्षेत्र हिरवाईने नटणार....



शिरपूर प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांचा शिरपूर तालुक्यासाठी पर्यावरण पूरक"ड्रीम प्रोजेक्ट" साकारण्यात येत आहे. म्हणजेच करवंद येथील ६२ एकर वनक्षेत्र हिरवाईने नटणार असून महाराष्ट्र शासनाने याबाबत परवानगी बहाल केली आहे, ही तालुक्यातील जनतेसाठी खूप गौरवपूर्ण बाब आहे.

माजी मंत्री आमदार तथा श्री विलेपार्ले केळवणी मंडळ मुंबई अध्यक्ष अमरिशभाई पटेल व सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून शिरपूर शहर व तालुक्याला पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण तालुका बनविण्याचा दृढ़निश्चय करण्यात आला आहे.

करवंद गावाजवळ वनक्षेत्राचा हा भाग पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाने ७ वर्षांसाठी श्री विलेपार्ले केळवणी मंडळ, मुंबई या संस्थेसह मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट ला मौजे करवंद ता. शिरपूर, जि. धुळे येथील २५ हेक्टर म्हणजेच ६२ एकर अवनत वनक्षेत्र वनीकरण करण्यासाठी बहाल करण्यात आले आहे. या ७ वर्षांच्या कालावधीत पटेल परिवार शिरपूर तालुक्याच्या निरोगी भवितव्यासाठी अनेक उपक्रम राबविणार आहे.

याबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन आदेश क्रमांक : एफएलडी-२०२२/प्र.क्र.२८८/फ-१० मंत्रालय, मुंबई दि. १७/११/२०२३ नुसार अवनत वन क्षेत्राचे पुनर्वनीकरण करण्यासाठी खाजगी व अशासकीय संस्थांचा सहभाग घेण्याबाबत त्रिपक्षीय करारनामा करुन शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

या ६२ एकर क्षेत्रवर लागवडीसाठी रोपे संख्या १,१११ प्रती हेक्टर प्रमाणे असे एकूण २७ हजार ७७५ रोपे लागवड करण्यात येणार आहे. या अवनत वनक्षेत्रात वृक्ष लागवड करणे, जल व मृदसंधारण करणे, ७ वर्षापर्यंत त्यांचे संरक्षण व संवर्धन करण्याचे काम श्री विलेपार्ले केळवाणी मंडळ मुंबई, यांच्या अर्थसहाय्याने मुकेश पटेल चॅरीटेबल ट्रस्ट, शिरपूर मार्फत करण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी व त्याच्या व्यवस्थापनासाठी येणारा संपूर्ण खर्च श्री विलेपार्ले केळवाणी मंडळ मुंबई, ही संस्था करणार आहे.

हे संपूर्ण वनक्षेत्र वनराईने समृद्ध करण्यात येणार असून शिरपूर तालुका पर्यावरणाच्या दृष्टीने मोठे केंद्र तयार होत आहे. पटेल परिवार शिरपूर तालुक्यासाठी राबवत असलेल्या नवनवीन प्रकल्पांबाबत शिरपूर तालुक्यातील जनता समाधान व्यक्त करत आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध