Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १६ मार्च, २०२२

वृत्तपत्रात बातमी छापली नाही म्हणून पत्रकारांवरील हल्ले ही चिंतेची बाब कुठली बातमी छापायची किंवा नाही याचा अधिकार पत्रकारांना देणार की नाही ? पत्रकार हल्ला विरोधी कृति समितीचे मुख्य निमंत्रक एस.एम.देशमुख यांचा संतप्त सवाल



बातमी छापली नाही म्हणून पत्रकारांवर होणारे हल्ले ही नित्याचीच बाब झाली असून सांगली जिल्ह्यात महिनाभरात दोन पत्रकारांवर हल्ले झाले असून या घटनेने पत्रसृष्टीत संतापाची लाट उसळली असून या घटनांचा पत्रसृष्टी तीव्र धिक्कार करीत आहे.कुठली बातमी छापायची किंवा नाही एव्हढा तरी अधिकार पत्रकारांना देणार आहात की नाही? असा संतप्त सवाल मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त व पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे मुख्य निमंत्रक एस.एम. देशमुख यांनी केला आहे.

एस.एम.देशमुख यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की,कुठली बातमी छापायची किंवा नाही,एवढा तरी अधिकार पत्रकारांना देणार आहात की नाही ? एखाद्याच्या विरोधात बातमी आली तर पत्रकारांवर हल्ले होणे हे नित्याचेच झाले असले तरी आता बातमी छापली नाही म्हणून देखील पत्रकारांवर हल्ले होत आहेत.सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील बाज येथे काल अशीच घटना घडली. बाज येथील ‘तरुण भारत’चे पत्रकार नाना बाबू गडदे यांनी बातमी छापली नाही म्हणून त्यांना लाठ्या, काठ्या उसाने बेदम मारहाण करण्यात आली. पोलिसांनी पत्रकार संरक्षण कायद्यान्वये ७ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून माजी सरपंचासह सर्व आरोपी फरार आहेत.बाज येथील माजी सरपंच संजय आनंदा गडदे यांनी ८ मार्च रोजी महिला दिनाचा कार्यक्रम ठेवला होता. त्याची बातमी मला द्या मी पाठवतो असे पत्रकाराने सांगितले होते.मात्र माजी सरपंचाने ती दिली नाही. परिणामतः बातमी छापली गेली नाही.त्या रागातून पत्रकार गडदे यांच्यावर हल्ला करण्यात आला.घटनेची माहिती मिळताच जत येथील सर्व पत्रकार एकत्र आले आणि त्यांनी पोलीस ठाणे गाठले. आरोपीच्या विरोधात पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वीच कडेगाव तालुक्यात सुरज जगताप यांच्यावर हल्ला करण्यात आला होता.त्या प्रकरणात जिल्ह्यातील पत्रकारांनी एकजुटीचे दर्शन घडवत आरोपींना गजाआड करण्यात यश मिळविले होते. एका महिन्यात पत्रकारांवरील हल्ल्याच्या दोन घटना घडल्याने राज्यासह सांगली जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये संतापाची भावना आहे.

जत तालुका पत्रकार संघ,सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ, मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने या हल्ल्याचा निषेध केला असून पत्रकारांनी दाखविलेल्या एकजुटीबददल परिषदेचे उपाध्यक्ष शिवराज काटकर यांनी जिल्ह्यातील पत्रकारांना धन्यवाद दिले आहेत.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध