Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

    बुधवार, १६ फेब्रुवारी, २०२२

    महाड पूर निवारण कार्यवाहीचा पालकमंत्री आदिती तटकरे यांनी घेतला आढावा



    मुंबई, दि. 15: रायगड जिल्ह्यातील महाड येथे सावित्री नदीला जुलै महिन्यात आलेल्या पूरामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी झाली. भविष्यात अशा परिस्थितीमुळे आपतकालीन परिस्थिती निर्माण होऊ नये, तसेच पूर निवारणासाठी सर्वोतोपरी उपाययोजना करण्यासाठी पूरनिवारण समिती, आयआयटी (मुंबई) जलसंपदा विभाग, कोंकण रेल्वे, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, सार्वजनिक बांधकाम  या सर्व संबंधित विभागांची संयुक्त बैठक दि. 4  फेब्रुवारी रोजी घेण्यात आली होती. 

    त्या अनुषंगाने केलेल्या कार्याचा प्रगती अहवाल व पूर निवारणासाठीच्या कार्यवाहीची गतिमानता वाढविण्यासाठी आज राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.
     
    महाड पूर निवारण समितीच्या उपस्थित झालेल्या या बैठकीत खासदार सुनील तटकरे,आमदार भरतशेठ गोगावले,महाड नगराध्यक्षा स्नेहल जगताप,मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता,रायगड जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर,महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी,डॉ. अमितकुमार सैनी,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी अमोल यादव, महाड प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड हे या बैठकीसाठी उपस्थित होते.
     
    यावेळी पालकमंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या की,प्रत्यक्ष कार्यस्थळी प्रगती होण्यासाठी या बैठकीच्या माध्यमातून विहीत कालावधीमध्ये म्हणजे पावसाळ्यापूर्वी सर्व उपाययोजना करणे आवश्यक आहे.या उपाययोजना करण्यासाठी महाड प्रांतअधिकारी यांनी जलसिंचन विभाग,पूरनिवारण समिती, आयआयटी (मुंबई) व कोंकण रेल्वे यांच्यामध्ये समन्वयकाची भूमिका साधावी.सावित्री नदीमधील गाळ तसेच नदी पात्रातील बेटे काढण्याची प्रक्रिया अधिक जलद होणे गरजेचे आहे. तटीय नियमन क्षेत्र म्हणजेच सीआरझेडच्या परवानगीबाबत तातडीने प्रस्ताव सादर करण्यात येईल,असे पालकमंत्री कु. तटकरे यांनी यावेळी सांगितले. 
    महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या अखत्यारित असलेल्या नदी पात्रातील गाळ हातपाटीने काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यास परवानगी दिल्याबाबत माहिती यावेळी  देण्यात आली.जलसिंचन विभागाच्या तांत्रिक विभागाने आवश्यक त्या यंत्रसामुग्रीची उपलब्धता खाजगी पद्धतीने करण्यात येत असल्याबाबत यावेळी सांगितले.मागील बैठकीच्या अनुषंगाने महाड येथील कोकण रेल्वेच्या पुल परिसरातील भरावामुळे पाण्याच्या पातळीबाबत वस्तुस्थिती अहवाल आयआयटी, मुंबई यांच्याकडून मागविण्यात आला आहे. 

    त्यानुसार जुलै महिन्यात आलेल्या पूराच्या मुख्य कारणामंध्ये या पुलामुळे विशेष प्रभाव नसल्याबाबत सांगितले. 
    यावेळी खासदार सुनील तटकरे म्हणाले की,सर्व शासकीय यंत्रणा ह्या सावित्री नदी व महाड येथे भविष्यात आपतकालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी बहुआयामी प्रयत्न करीत आहेत.सर्व स्तरावरील परवानग्या, प्रत्यक्ष कार्यासाठी करण्यात येणाऱ्या निविदा प्रकीया याबाबत अधिक गतिमानतेन कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना संबंधित सर्व शासकीय विभागांना दिल्या.

    आपतकालीन व्यवस्थापनासाठी महाड येथे कारावयाच्या कार्यवाहीसाठीची कार्यमर्यादा लक्षात घेता, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी नियुक्त केलेल्या संस्थेस जलसंपदा विभागाने कालबद्ध वेळेत कार्य करण्यासाठी विहीत पद्धतीने नियुक्त केल्यास याकामी वेळीची बचत होईल.शासकीय यंत्रणा याबाबत सर्वपातळीवर कार्यरत आहेत,असे मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता म्हणाले.महाड येथे सावित्री नदीपात्रात करावयाच्या प्रत्यक्ष कार्यास गतिमानता मिळाली असून आवश्यक त्या बाबींची पूर्तता करुन प्रशासकीय यंत्रणा कार्य करेल असा विश्वास व्यक्त करुन महाड पूर निवारण समिती,प्रशासकीय यंत्रणांचे उपस्थित स्थानिकांनी यावेळी आभार मानले.  

    तरुण गर्जना वृत्तपत्र सह
    चंद्रशेखर अहिरराव धुळे

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

    टिप्पणी पोस्ट करा

    प्रसिद्ध